Sunday, 2 September 2018

श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान, कर्दळीवन प्रवासवर्णन भाग ४

॥ श्री स्वामी समर्थ ॥
----------------------
श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान, कर्दळीवन प्रवासवर्णन भाग ४
----------------------
दि.२५ जानेवारी २०१६
तिसरा दिवस उजाडला. अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही पहाटे ५ वाजता उठलो. कारण होते परतीचा प्रवास. संपूर्ण गुहेचे निरीक्षण केले आणि पहाटे ६ वाजता परतीच्या प्रवासाला निघालो. स्वामींच्या प्रकट स्थानाकडे जाणार्‍या रस्त्याकडे पाहून मनोमन स्वामींचे अविस्मरणीय दर्शन डोळ्यात साठवून परतीच्या प्रवासाकडे निघालो. आता चांगलेच उजाडले होते. मी, शाम मामा, डॉ.राहुल सर, निलेश सर आणि कोंडा सर मागे राहिलो होतो. ८ वाजता आप्पाराव स्वामी यांच्या व्यंकटेश किनारा येथे आम्हाला न्यायला बोट येणार होती. त्यामुळे आमची पावले व्यंकटेश किनार्‍याकडे झपझप पडत होती. रात्रीच्या अंधारात भयानक वाटणारा डोंगर आता हळू हळू प्रकाशमान होवून अधिकच भयानक वाटत होता. माझा विश्‍वासच बसत नव्हता की एवढ्या घनदाट जंगलातून मी रात्रीचा प्रवास केला. अत्यंत घनदाट जंगलातून पाऊल वाटेने आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आता उगवतीचा सूर्य हळूहळू वर येवू लागला.  आता परतीच्या प्रवासात आम्हाला प्रथम स्वामींचे चरण दर्शन झाले. समुद्र गुरूजी, तुकाराम गुंजकर गुरूजी व गणेश तरडे गुरूजी यांनी स्वामींच्या चरणावर चंदनाचा लेप देवून फुलांनी शिवलिंग तयार केले होते. अत्यंत मनमोहक असे दृश्य दिसत होते. मी तो क्षण टिपण्यासाठी लगेच कॅमेरा सुरू केला आणि तो क्षण टिपला. स्वामींच्या चरणावर मनोभावे डोके ठेवून मी दर्शन घेतले. दर्शन घेवून आम्ही नामाजवळ आलो. येथेही गुरूजींनी चंदनाने तयार केलेला नाम अत्यंत मनमोहक दिसत होता. स्वामींच्या नामाचा जयजयकार करीत दर्शन घेवून पुढील वाटचालीकडे निघालो.


सर्वजण पुढे निघून गेले. मी व कोंडा सरच मागे राहिलो. कारण मी प्रत्येक क्षण कॅमेर्‍यात टिपत होतो. कोंडा सर म्हणाले, लवकर चल. नाहीतर एकटाच या जंगलात राहशील. मी चालण्याला वेग घेतला. चालत चालत आम्ही स्वामींची महती एकमेकांला सांगू लागलो. मी त्यांना माझ्या कर्दळीवनात येण्यासाठी आलेला प्रसंग व स्वामींनी स्त्री रूपात दिलेल्या संजीवन पादुकांचे वर्णन सांगितले तर ते म्हणाले, स्वामींची लिला अगाध आहे. ते सदैव भक्तांची परिक्षा बघतात आणि स्वतःच त्याला पासही करतात. माझेही तसेच झाले आहे. आमच्या घरात माझ्याशिवाय स्वामी भक्त कोणीच नाही. असे सांगून त्यांनी मला त्यांचा प्रसंग सांगितला. ते म्हणाले, लग्नाला ४-५ दिवसच झाले होते आणि माझा ऍक्सीडेंट झाला. त्या ऍक्सीडेंटमध्ये माझ्या पायाला इजा झाली. सोलापूरमधील डॉक्टरांकडे मला नेण्यात आले. ते म्हणाले, आम्ही या पायाला काहीच करू शकत नाही. कायमचा अधू झाला आहे पाय. हे ऐकून आमच्या घरचे चिंतातूर झाले. तेवढ्यात मला मुंबईचे डॉक्टर भेटले आणि त्यांनी मला मुंबई ला येण्याचे सांगितले. सोलापूरमध्ये व पुण्यामध्ये मला माझ्या पायाच्या ऑपरेशनकरीता येणारा खर्च जास्त सांगितला होता. तरीही मी मुंबईला जाण्याचे धाडस केले. तेथे ज्यांनी सचिन तेंडुलकर यांना फिटनेस चे प्रशिक्षण दिले त्यांच्याकडेच माझी अपॉईंटमेंट देण्यात आली. ते म्हणाले, अपघात तर मोठा आहे. परंतू याला ऑपरेशनची गरज नाही. मी जे व्यायाम सांगेन ते तुम्ही केले तर कमीत कमी ४ महिन्यात तुम्ही चालायला लागाल. ते ऐकून मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. मी त्यांनी सांगितलेले व्यायाम करू लागलो आणि काय आश्‍चर्य ज्या डॉक्टरांनी मला अपंग झाल्याचे सांगितले होते तेच डॉक्टर मला चालताना पाहून अचंबीत झाले होते आणि त्याच वर्षी डॉ.राहुल सरांनी मला कर्दळीवनात येणार का? म्हणून विचारले आणि मी लागलीच हो सुद्धा म्हणलो. स्वामींच्या कृपेने मी त्यावर्षी माझी कर्दळीवनाची यात्रा सफल झाली आणि २ वेळा मी गिरनार लाही जावून आलो. आता कर्दळीवनात येण्याची ही माझी दुसरी परिक्रमा आहे. हे शक्य झाले केवळ स्वामींच्या कृपेनेच. स्वामी करून घेतात फक्त आपली श्रद्धा असायला हवी. हे ऐकून मीही आश्‍चर्यचकीत झालो आणि त्यांच्या पायाकडे पाहू लागलो. कोंडा सर मला हे सांगत असतानाच मला शाम मामा चा आवाज ऐकू आला. मी ओ दिली. तर म्हणाला, पटकन ये. येथे मस्त फोटो काढता येईल. निलेश सर म्हणाले, पळत ये पण सावकाश ये. येथे मस्त भारताचा नकाश आणि सूर्यदेवाचे प्रतिबिंब असे एकत्रीत फोटो काढायला मिळेल. मी ही उत्सुकतेपोटी तेथे गेलो. पाहतो तो भारताचा ज्याप्रमाणे कन्याकुमारीकडे आकार आहे तसाच आकार नदीने घेतला होता आणि त्या नदीत सूर्यदेवाचे प्रतिबिंब अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसत होते. मी पटकन तो क्षण टिपू लागलो.
असेच क्षण टिपत बोलत बोलत आम्ही संपूर्ण आयुष्यभराची शिदोरी घेवून जड अंतःकरणाने कर्दळीवनाचा डोंगर उतरू लागलो. सकाळी ८ वाजता आप्पाराव स्वामींच्या घरी पोहोचलो. आम्ही जेथून स्वामींच्या कर्दळीवनाचा डोंगर चढण्यास सुरूवात केली होती त्या पायरीवर डोके ठेवून नमस्कार केला आणि मनात बोललो, की हे स्वामीराया, माझी कर्दळीवनाची परिक्रमेकरीता जरी मी आलो असलो तरी ही परिक्रमा माझ्या भिसे परिवाराच्यावतीने व समस्त स्वामी समर्थ भक्त परिवाराच्या कृपेने केली. ती तुम्ही सुखरूप व सुरक्षीत पुर्ण करून घेतली. असेच आम्हा साधकांवर आपले कृपाछत्र कायम राहु द्या व आपल्या दर्शनाचे भाग्य आमच्या नशिबी कायम येवू द्या अशी मनोभावे प्रार्थना केली.
आप्पाराव स्वामी यांच्याकडे थोडी विश्रांती घेतली. बेडरोल व काठ्या आप्पाराव स्वामींकडे जमा केल्या. आमच्यातील काहीजण नदीवर स्नानासाठी गेले तर काहीजण मस्त झाडाखाली बसून विश्रांती घेवू लागले. सकाळी ८.३० वाजता होडी आम्हाला न्यायला आली. सर्वजण होडीमध्ये बसले आणि स्वामी नामाचा जयघोष करून आम्ही अक्क महादेवींनी ज्या ठिकाणी ३५० वर्षे तपश्‍चर्या केली त्याठिकाणाकडे निघालो. अगदी थोड्याच अंतरावर असलेल्या त्या गुहेजवळ पोहोचताच बुवा महाराजांनी अक्क महादेवीची महती सांगितली. त्या ठिकाणी कसे जायचे हेही सांगितले. कोणी कसे चालायचे, कसे दर्शन घेण्यासाठी जायचे हे सांगितले. मी माझा कॅमेरा तयार ठेवला. म्हणले काहीही झाले तरी आतील शिवलिंगाचा फोटो घ्यायचाच. त्या उद्देशाने मी शाम मामा आणि कोंडा सर निघालो. निलेश सर व डॉ.राहुल सर होडीमध्येच बसले. मी म्हणालो, निलेश सर येणार का? तर तिकडून डॉ.राहुल सर थांबा म्हणायचे. मी चला म्हणायचो आणि राहुल सर थांबा म्हणायचे. अशातच द्विधा मनःस्थिती निलेश सरांची झाली. मी निलेश सरांना शेवटचे विचारले, माझा मान राखणार नाही का? भाचा एवढं प्रेमाने बोलावतो आहे चला की... तुम्ही असल्यावर चांगले दर्शन होईल. असे म्हणताच निलेश सरांनी होडीमधून जवळजवळ उडीच मारली. आम्ही हसतच अक्क महादेवी गुहेकडे निघालो. गुहा पूर्णपणे बंद होती. ऑक्सीजन येण्यासाठीही जागा नव्हती. त्यामुळे भयंकर वास येत होता. अशातच आम्ही गुहेत आलो. पाहतो तर काय आतमध्ये जाण्यासाठी एकाच व्यक्तीची जागा होती. एकच व्यक्ती दर्शन घेवू शकत होता. तो बाहेर आल्यानंतरच दुसरा व्यक्ती आत जात होता. असे करत करत माझा नंबर आला. मी पहिला उभा राहून...नंतर थोडे झुकुन व नंतर रांगत शिवलिंगाजवळ पोहोचला. तेथे पोहोचताच मला शिवलिंग कोठे आहे हेच कळाले नाही. माझ्यामागे तेथील पुजारी होता. मी म्हणालो, कोठे आहे शिवलिंग? त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात मला शिवलिंग दाखविले. मला ते दिसले आणि मी नतमस्तक झालो. कॅमेरा सुरू केला आणि शिवलिंगाचा फोटो काढला. अत्यंत सुंदर फोटो मला मिळाला. मी शिवलिंगाचे निरीक्षण केले तर शिवलिंगावर एक एक थेंब पाणी अभिषेकाप्रमाणे पडत होते आणि त्या एका थेंबामधून संपूर्ण गुहेमध्ये ऑक्सीजन तयार होत होता. आता मला कळाले की, ऑक्सीजन येथे नसतानाही कसा तयार होतो ते... दर्शन घेवून घामाघूम अवस्थेतच बाहेर आलो. कॅमेरातील शिवलिंगाचा फोटो कसा आला आहे हे पाहण्यासाठी मी कॅमेरा सुरू केला. अत्यंत सुंदर असा तो फोटो मला मिळाला. मी सर्वांना दाखविला तर सर्वचजण माझे कौतुक करू लागले. आम्हाला ही हा फोटो हवा म्हणू लागले. दर्शन घेवून आम्ही होडीने पुन्हा श्रीशैलकडे निघालो.

दीड तासाच्या त्या प्रवासात मी फक्त स्वामींचे अविस्मरणीय दर्शन, कर्दळीवनातील प्रसंग आणि अक्क महादेवीच्या गुहेतील ते शिवलिंग याचाच विचार करीत होता. पाताळगंगा येथे पोहोचताच रोप वे ने श्रीशैलकडे जाण्याचे ठरले. आम्ही सर्वजण रोपवेकडे निघालो. सर्वांना पुढे पाठवून मी, निलेश सर, डॉ.राहुल सर आणि समुद्र गुरूजींचे भाऊ एका रोपवेत बसून वरती आलो. रोपवेमधून येत असतानाही मला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. आम्ही श्रीशैल मध्ये पोहोचलो. तेथे आमच्या सर्व गाड्या आल्या होत्या. सर्वांना आता भूक लागली होती. त्यामुळे श्रीशैलमध्येच जेवण करून सोलापूरकडे रवाना होवू असे ठरले. सर्वांनी जेवण करून श्रीशैल मंदिरात जावू लागलो. अर्धा तासाच्या प्रतिक्षेनंतर आम्हाला श्रीशैलचे दर्शन झाले. दर्शन घेवून मी माझा मोबाईल सुरू केला आणि पप्पा, आई व पूजाला फोन केला. मी सुखरूप श्रीशैलमध्ये आलो आहे. कर्दळीवनातील प्रसंग, स्वामींचे अविस्मरणीय दर्शन, अक्क महादेवीची गुहा, गुहेतील शिवलिंग, होडीतील प्रसंग आणि श्रीशैलचे दर्शन असे किती सांगू आणि किती नको झाले होते. २ दिवस मोबाईल बंद असल्यामुळे माझ्याशी संपर्कच होवू शकला नव्हता. त्यामुळे तेही आनंदात होते. एक मिनिट जरी फोन बंद झाला तरी मन कासावीस होते. परंतू स्वामींच्या २ दिवसाच्या कर्दळीवनाच्या सहवासात मला स्वामींशिवाय कोणीच आठवले नाही. काय जादू आहे त्या कर्दळीवनात कोणास ठाऊक....मी स्वामीनीशी फोनवर बोललो, तर ती फक्त पप्पा...पप्पा... एवढच म्हणत होती. कधी एकदा जावून भेटेन असे झाले होते. मी फोन ठेवला आणि सायं.४ वाजता सोलापूर कडे सर्व गाड्या मार्गस्थ झाल्या. सर्व गाड्या पुढे गेल्या. आमच्या गाडीमध्ये डॉ.राहुल सर, निलेश सर यांच्याबरोबर सायं.४.३० वाजता साक्षी गणपती येथे पोहोचलो. येथे मी प्रथमच लिहणारा गणपती पाहिला. मी त्या गणपतीचे महत्व विचारले, तर मामा म्हणाला, आपण श्री शैलचे दर्शन घेवून साक्षी गणपतीचे दर्शन घेतले तर आपण श्रीशैल येथे आल्याचे साक्ष म्हणून साक्षी गणपती आहे. दर्शन घेवून आम्ही घाट उतरून सोलापूर कडे मार्गस्थ झालो. गाडीमध्ये पाठीमागे मी व नागनाथ सर बोलत होतो. मी स्वामीनी (माझी मुलगी) चा विषय काढला आणि आज खूपच आठवण येते असे म्हणू लागलो. तेवढ्यात नागनाथ सरही म्हणाले, मलाही माझ्या मुलीची खूप आठवण येते. तीचं ते बोबडं बोलणं...मी रात्री कितीही वाजता घरी जावू देत तिला घेतल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय कधीच झोपलो नाही...असे म्हणून त्यांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. असेच बोलत बोलत आम्ही रात्रौ.१२ वाजता श्री क्षेत्र कडगंची येथे पोहोचलो. येथे आम्ही जेवण केले आणि पहाटे ३.३० वाजता सोलापूर ला पोहोचलो. डॉ.राहुल सरांच्या येथे सर्व गाड्या आल्यानंतर सर्वांना निरोप देवून आम्ही घरी आलो...
खरेच श्री स्वामींच्या कर्दळीवनाचा आलेला योग, श्री स्वामींचे स्वरूप दर्शन आणि तो प्रवास अविस्मरणीय होता. श्री स्वामींच्या कृपेने कोणालाही काहीही त्रास न होता परिक्रमा पूर्ण झाली. स्वामींच्या कृपेने येथून पुढेही ही परिक्रमा अशीच सुरू रहावी एवढीच स्वामी चरणी प्रार्थना....
स्वामींच्या प्रकट स्थानाविषयीची माहिती स्वामी भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न होता....
धन्यवाद...!


--------------------------------
औदुंबर सूर्यकांत भिसे, वेळापूर
--------------------------------

श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान, कर्दळीवन प्रवासवर्णन भाग ३

॥ श्री स्वामी समर्थ ॥
----------------------
श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान, कर्दळीवन प्रवासवर्णन भाग ३
----------------------


दि.२४ जानेवारी २०१६
दुसरा दिवस स्वामी भेटीचा. अक्क महादेवी च्या गुहेपासून स्वामींचे प्रकट स्थान सुमारे १.३० ते २ तास दूर होते. सकाळी ७.३० वाजता उठून आवराआवर केली आणि सकाळी ८ वाजता स्वामींकडे निघालो. स्वामींच्या प्रकट स्थानाकडे जाणार्‍या पायरीचे दर्शन घेतले आणि निघालो स्वामी भेटीच्या ओढीने प्रकटस्थानाकडे. आता चांगले उजाडले होते. त्यामुळे जंगलाची भयानकता पुरेपूर जाणवत होती. शेजारी कोण उभे आहे हे देखील त्या जंगलामध्ये कळत नव्हते. एवढे घनदाट जंगल होते. या भयानक जंगलामध्ये दुष्काळाची झळा जाणवत होत्या. पावसाळ्यामध्ये हिरवेगार दिसणारे हे जंगल आज उजाड माळरान बनले होते. पिवळ्या गर्द रंगामध्ये ते जंगल सूर्याच्या प्रकाशामध्ये अधिकच सोनेरी दिसत होते. मी बॅग मधून कॅमेरा काढला आणि सभोवतालचे दृश्य कॅमेरामध्ये कैद करू लागलो.  वेड्यावाकड्या झाडीमधून वाट काढीत आम्ही स्वामींच्या प्रकटस्थानाकडे जात होतो. दूरून मोरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. प्रसन्न हवा सुरू होती आणि त्यातच स्वामींच्या दर्शनाची ओढ असा प्रवास सुरू होता. सपाट प्रदेश असल्यामुळे चालताना त्रास जाणवत नव्हता. चालत चालत विचार करीत होतो की, कसे असेल स्वामींचे प्रकटस्थान? चालत चालत मला स्वामींचा ‘तोचि एक समर्थ’ हा चित्रपट आठवला. त्यामध्ये स्वामी समर्थ कसे प्रकट झाले ते चित्र डोळ्यासमोर फिरू लागले. उद्धव नावाचा लाकुडतोड्या...झाडावर चढून लाकडे तोडतो आणि त्याच्या हातातून कुर्‍हाड निसटते. हातातून निसटलेली कुर्‍डा झाडाखाली असलेल्या वारूळात शिरते आणि वारूळात रक्ताची चिळकांडी बाहेर पडते आणि तेजोमय प्रकाशात श्री स्वामी समर्थ प्रकटतात.... हे सर्व चित्र डोळ्यासमोर फिरत असतानाच आम्ही एका झोपडीपाशी आलो. अत्यंत स्वच्छ अशी ती झोपडी होती. ही झोपडी कोणाची? असे मी विचारले. तेव्हा शाम मामा म्हणाला, ही आदिवासी समाजाची झोपडी आहे.... मी आदिवासी म्हणल्यावर थोडा घाबरलो, परंतू मामा म्हणाला, ते आपल्यासारखेच आहेत. घाबरू नकोस. एवढ्या उजाड माळरानावर, घनदाट जंगलामध्ये फक्त एकच झोपडी. कसे रहात असतील हे लोक? मनात म्हणले, ज्यांच्या सानिध्यात ही माणसे राहतात असे स्वामी बरोबर असताना कशाची भिती... आम्ही चालतच होतो. सकाळचे ९ वाजत आले होते. मी विचारले अजून किती लांब जायचे आहे? डॉ.राहुल सर म्हणाले, अजून अर्धा तास चालावे लागेल... चला अर्ध्या तासाने का होईना स्वामींचे दर्शन तरी होईल. बोलत बोलत आम्ही एका ठिकाणी थांबलो. मला निलेश सर म्हणाले, तुझ्या बॅगमध्ये असणारे शेंगदाण्याची पोळी काढ. मी म्हणालो, अजून आंघोळ नाही केली आणि आत्ता पोळी खायची. ते म्हणाले, खायची नाही रे माशांची टाकायची आहे. समोर एके ठिकाणी पाण्यामध्ये असंख्य छोटे, मोठे मासे होते. मी पोळी काढली आणि माशांना खायला दिली. माशांना खावू घालून आम्ही स्वामींच्या प्रकट स्थानाजवळ पोहोचलो. प्रचंड वृक्षाच्या सानिध्यात एका गुहे सारखे दिसणारे स्वामींचे प्रकट स्थान दिसले आणि मनोमन धन्य झालो. आम्ही खाली उतरू लागलो. शाम मामा म्हणाला, हे औदुंबर, वड आणि पिंपळाचे एकत्र झाडे आहे आणि याच्या मुळ्या स्वामींच्या प्रकटस्थानापासून सुरू होतात. मी आकाशात पाहिले तर उंचच्या उंच झाड एकत्र वाढले होते. आम्ही खाली आलो. मस्त डोंगरातून पडणार्‍या शॉवरमध्ये स्नान करून स्वामींच्या प्रकटस्थानाजवळ पोहोचलो. तेथे एक शिवलिंग होते. मी पटकन स्वामींच्या त्या शिवलिंगावर डोके ठेवून नतमस्तक झालो आणि म्हणालो, धन्य झाला आजचा दिवस. तुमच्या दर्शनाची आस मनी ठेवूनच मी प्रवासाला आलो होतो. आज तुमचे दर्शन झाले जीवन सार्थक झाले. माझी परिक्रमा तुम्ही स्वतः पूर्ण करून घेतली. पैशांचा प्रॉब्लेम उत्पन्न करून तुम्ही माझी परिक्षाही पाहिली. माझ्या मनात तुमच्या प्रकटस्थानाकडे येण्याचे स्वप्न तुम्ही स्वतः पूर्ण करून घेतले. स्वामीराया धन्य झालो मी आज.

सर्वजण स्वामींचे दर्शन घेवू लागले. समुद्र गुरूजी म्हणाले, आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे. मग काय आम्ही बसलो स्वामींची पूजा करायला. समुद्र गुरूजी मंत्र पठण करीत होते आणि आम्ही शिवलिंगावर दूध, दहीचा अभिषेक करीत होतो. अभिषेक झाल्यानंतर चंदन, अत्तर यांचा लेप लावण्यास सुरूवात केली. चंदनाचा व अत्तराचा वास सर्वत्र दरवळू लागला. त्यानंतर फुलांनी शिवलिंग सजविण्यात आले. बाजूला विड्याची पाने ठेवण्यात आली. त्या बाजुला दिव्यांची रोषणाई करण्यात आली. दिव्यांच्या रोषणाईमध्ये शिवलिंग अधिकच तेजोमय दिसू लागले. नंतर आम्ही श्री स्वामींची आरती केली आणि पुनः पुन्हा तुमच्या दर्शनाचा लाभ मिळावा अशी इच्छा व्यक्त करून आम्ही बाहेर आलो. येथे श्रींना प्रसाद म्हणून राजगीरा लाडू, बेसन लाडू व पेढा नैवेद्य दाखविण्यात आला. तो प्रसाद सर्वांना देण्यात आला. नंतर आम्हाला बुवा महाराजांनी स्वामींच्या प्रकट स्थानाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, गाणगापूर येथील मुख्य पुजार्‍यांना या स्थानाविषयी माहिती झाली. परंतू त्यांनी ५० वर्षानंतर या स्थानाविषयी माहिती दिली. शिवलिंगाच्या खालून औदुंबर, वड व पिंपळ या झाडाचे एकत्र मुळ आहे. आम्ही स्वामींचे ते स्वरूप दर्शन डोळ्यामध्ये साठवून अक्क महादेवीच्या गुहेकडे निघालो.

आता दुपारचे १ वाजत आले होते. सूर्य डोक्यावर आला होता. काल रात्री चालताना त्रास कमी जाणवला. परंतू आता आम्ही सारखे विश्रांती घेत घेत चालत होतो. काल चालताना आम्हाला पाण्याची एकच बाटली पुरेशी होती. परंतू आज आमच्या जवळील ४ बाटल्या पाणी संपले होते. आम्ही डोंगरातून वाहणार्‍या झर्‍याला पाणी भरले आणि परतीच्या प्रवासाला निघालो. वाटेत एके ठिकाणी आम्ही विश्रांती घेत असताना संपूर्णपणे पालापाचोळा आणि मध्येच दोन आपट्याची पाने आपला तग धरून होती. मी मनात म्हणले, जेथे स्वामी तेथे काय कमी...उजाड माळरानावरही नंदनवन फुलविण्याची ताकद असणार्‍या स्वामींच्या परिसरात अशी लिला पहावयास मिळणारच...विविध आकाराची झाडे येथे पहायला मिळाली. मनातील आकार त्या झाडांमध्ये पहात आम्ही दुपारी ३ वाजता अक्क महादेवी गुहेत परत आलो. उन्हाचा तडाखा खूप असल्याने आम्ही दमलो होतो. त्यामुळे मस्त झोप काढायचे आम्ही ठरवले आणि जेवण करून आम्ही झोपी गेलो. सायंकाळी ४ वाजता आम्ही उठलो. रूद्र याग सुरू करायचा होता. सायंकाळी ५ वाजता रूद्र याग सुरू करण्यात आला. समुद्र गुरूजींबरोबर आणखी २ गुरूजींनी रूद्र यागाची तयारी केली होती. रूद्र याग सुरू झाला. गुरूजींच्या मंत्रांनी अक्क महादेवीची गुहा भरून गेली होती. अत्यंत धार्मिक वातावरण तयार झाले होते. थोड्या वेळात अंधार पडला. गुहेमध्ये लाईटची व्यवस्था नसल्याने आम्ही बॅटरी सुरू केल्या. बॅटरीच्या प्रकाशातच याग सुरू होते. रात्रौ.१२ वाजता यागची सांगता झाली. अत्यंत मनोभावे यागची सांगता झाली आणि कर्दळीवनातील आमची परिक्रमा पूर्ण झाली.

बुवा महाराज म्हणाले, उद्या परतीचा प्रवास पहाटे ५ वाजता करायचा आहे. लवकर उठा.
मी स्वामींचे स्वरूप दर्शन, कर्दळीवनातील संपूर्ण परिसर, रूद्र याग, अक्क महादेवीची गुहा डोळ्यात साठवून झोपी गेलो ते पहाटे परतीच्या प्रवासाकरीता उठण्यासाठी.....


क्रमशः
--------------------------------
औदुंबर सूर्यकांत भिसे, वेळापूर
--------------------------------

Thursday, 21 April 2016

श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान, कर्दळीवन प्रवासवर्णन भाग २

॥ श्री स्वामी समर्थ ॥
----------------------
श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान, कर्दळीवन प्रवासवर्णन भाग २
----------------------


दि.२३ जानेवारी २०१६
पहाटे ३.३० वाजता उठलो. सर्व स्नानादि कर्मे उरकली. मामाने गाडी पुसली आणि सकाळी ५ वाजता आम्ही डॉ.राहुल सरांच्या घराकडे निघालो. ५ गाड्या बोलाविण्यात आल्या होत्या. सर्वजण थंडीचा बचाव करण्यासाठी स्वेटर, जरकीन घालून एकत्र जमा झाले होते. सर्वांच्या बॅग गाडीवर बांधण्यात आल्या आणि सकाळी ५.३० वाजता एकामागे एक ५ गाड्या श्रीशैल कडे मार्गस्थ झाल्या. पहाटेच्या धुक्यात सोलापूर बुडून गेले होते. माझ्या ओळखीचे डॉ.राहुल सर व निलेश सर शाम मामाच्या गाडीत होते .. त्यामुळे एकटे वाटत नव्हते...स्वामींच्या नामाचा जयजयकार झाला आणि गाड्यांनी वेग धरला...गेली २ वर्षे शाम मामा सारखा म्हणत होता, तुम्ही स्वामी भक्त आहात. कर्दळीवनात या. स्वामींचे प्रकट स्थान बघा. परंतू तसा योग जुळून येत नव्हता. अचानक शाम मामा, डॉ.राहुल सर आणि निलेश सर वेळापूर येथील श्री अर्धनारी नटेश्‍वर मंदिरात याग करण्यासाठी आले होते. तेव्हा अचानक त्यांनी कर्दळीवनाचा विषय काढला आणि मी ठरविले की काहीही झाले तरी २३ जानेवारी रोजी कर्दळीवनात जायचेच. ... ते आता पूर्ण होणार...


आम्ही सकाळी नास्त्यासाठी श्री क्षेत्र कडगंची येथे थांबणार होतो. श्री क्षेत्र कडगंची कडे जाताना भारद्वाज पक्षाने आमचा रस्ता ओलांडला. सगळे म्हणाले, शुभ शकून मिळाला. नाष्टा, जेवण कधी, कोठे करायचा हे ठरलेले होते... त्यामुळे सकाळी ८.३० वाजता आम्ही श्री क्षेत्र कडगंची येथे पोहोचलो. याठिकाणी श्री गुरु चरित्राचे लेखक श्री सायंदेव यांचे मंदीर आहे..येथे श्री गुरूदेव दत्तात्रय यांचे मंदिर आहे. श्री दत्तात्रयांची येथे अप्रतिम आणि सुंदर मूर्ती आहे. श्री गुरू दत्तात्रय आणि श्री सायंदेव यांचे दर्शन करून आम्ही नास्ता केला. येथे मस्त इडली सांबर वरती आम्ही ताव मारला.... थोड्याशा विश्रांती नंतर आम्ही श्रीशैल कडे निघालो.. जेवणाच्या ठिकाणी पोहोचायला वेळ होता. त्यामुळे मी मस्त झोप काढायची ठरवले. दुपारी ३ वाजता आम्ही मेहबूबनगर येथे दुपारच्या भोजनासाठी थांबलो. येथे वेलकम हॉटेलमध्ये सर्वांनी मस्त सांबर, भेंडी, चपाती, वरण, भात, दही, पापडाचा आस्वाद घेतला आणि सायंकाळी ४ वाजता आम्ही श्रीशैल कडे रवाना झालो. सायंकाळचे ६ वाजले होते. आम्ही श्री शैल चा घाट चढाई सुरू केली. अवघड वळणे शाम मामा अगदी सराईत पणे पार करीत होता.  डोंगर घाटातून गाडी जाताना मी कुठे काही हरीण, वाघ, जंगली श्‍वापदे दिसते का ते पहात होतो. परंतू मोर आणि माकड यांच्याशिवाय काहीच दिसले नाही. सरते शेवटी आम्ही ६.३० वाजता चेक पोस्ट जवळ पोहोचलो. तेथुन श्री शैल १५ किमी होते. येथे मी मोबाईल सुरू केला आणि घरी फोन करून सांगितले की, मी श्री शैल मध्ये पोहोचलो आहे. व्यवस्थित आहे. माझा फोन २ दिवस बंद राहील. रेंज नसल्यामुळे. त्यामुळे मी परत श्रीशैलमध्ये आल्यानंतर फोन करतो असे सांगून फोन बंद केला. मी फोन बंद केला खरा परंतू या आधी मी ५ मिनिटही माझा फोन बंद केला नव्हता. त्यामुळे माझा व घरच्यांचा दोन दिवस संपर्क नसणार म्हणल्यावर माझ्या जीवाची घालमेल सुरू झाली. तीच परिस्थिती घरच्यांचीही झाली असेल असाच विचार मनात येत होता. एकीकडे घरच्यांशी २ दिवस संपर्क नसणार म्हणून जीवाची घालमेल तर दुसरीकडे स्वामींच्या दर्शनाची ओढ अशा अवस्थेतच रात्रौ.७ वाजता आम्ही श्री शैल मंदिराजवळ पोहोचलो. तेव्हा असे ठरले की यंग माणसे रात्री डोंगर चढाईस सुरुवात करतील व जेष्ठ नागरीक पायथ्याशी असणार्‍या आप्पाराव स्वामी यांच्याकडे राहतील. आम्हाला आता होडी मधुन प्रवास करायचा होता. सुमारे ५ ते ७ किमी चा प्रवास ते पण होडीमधुन...शेवटी रात्री ८.२० वाजता बोट सुरु झाली आणि सर्वांनी स्वामी व गंगा मातेच्या नामाचा जयघोष सुरु केला व चंद्राच्या शितल प्रकाशात आम्ही प्रवास सुरु केला कर्दळीवनाकडे .... होडी सुरू झाल्यानंतर समुद्र गुरूजी यांनी गंगामातेची साडी चोळीने ओटी भरली व साडी चोळी गंगेला अर्पण केली आणि गंगा मातेचा जयजयकार केला. पौर्णिमा असल्याकारणाने चंद्र आम्हाला होडीतील प्रवासाला रस्ता दाखवित होता. अशा मस्त शितल छायेत आम्ही श्री व्यंकटेश किनारा येथे रात्री ९ वाजता पोहोचलो. येथे आप्पाराव स्वामींकडे थोडी विश्रांती घेतली. अंथरण्यासाठी येथे बेडरोल व चालण्यासाठी काठी घेतली. काही जेष्ठ मंडळी आप्पाराव स्वामी यांच्या येथे मुक्कामी राहिली व बाकीच्या लोकांनी रात्री १० वाजता स्वामीनामाचा जयघोष करून पहिल्या पायरीचे दर्शन घेउन स्वामी दर्शनासाठी डोंगर चढाईस सुरुवात केली. मी शाम मामा, निलेश सर, डॉ.राहुल सर, समुद्र गुरूजी यांच्याबरोबर प्रवास सुरु केला. पहिल्यांदाच पूर्ण चढाई होती.. त्यामुळे सावकाश चालत होतो. डोंगर चढाई करताना कसे चालायचे? पाय कसे टाकायचे? या सूचना आधीच शाम मामा ने मला दिल्या होत्या. त्यामुळे त्या सूचनांचे पालन करीतच मी डोंगर चढत होतो. चंद्रमा आम्हाला त्याच्या शितल छायेत व भरपूर प्रकाशात जंगलातील रस्ता दाखवित होता. त्यामुळे मध्ये मध्ये हातातील बॅटर्‍या बंद करीत होतो. डॉ.राहुल सर म्हणाले, दोन दोन फूट अंतर ठेवूनच चाला. म्हणजे एकत्र राहून प्रवास करू. मनात स्वामी दर्शनाची आस होती. त्यामुळे प्रचंड उत्साह संचारला होता. परंतू मनाच्या दुसर्‍या कोपर्‍यात याची भिती पण होती की, कोठून तरी जंगली श्‍वापद आपल्यावर हल्ला करेल. दाट काळोख, घनदाट जंगल आणि विविध आकार असलेली झाडे यातून आम्ही प्रवास डोंगर चढत होतो. मध्येच कोणीतरी आपल्याकडे पहात आहे असा भास झाला म्हणून मी त्यादिशेने बॅटरीचा प्रकाश टाकला तर ते एक झाडाचा बुंधा होते. मनातल्या मनात मी म्हणालो, हुशऽऽऽ झाड आहे आणि स्वामींना सांगितले, सुखरूप तुमचे दर्शन होवू द्या. सर्वांना व्यवस्थित तुमच्या चरणाशी आणा. अशा विचारातच आम्ही पहिल्या डोंगरातील एक टप्पा पूर्ण केला. आम्ही बोलत, बोलत चालत होतो आणि चंद्राचा शितल प्रकाश असल्यामुळे थकवा जाणवत नव्हता. शाम मामा म्हणाला, आता पूर्ण सपाट प्रदेश आहे. मला वाटले, चला आता चालताना त्रास होणार नाही. परंतू हा सपाट प्रदेश पूर्ण दगडांनी भरला होता. एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे उंच डोंगर अशा स्थितीत पाऊलवाटेने आम्ही मार्गक्रमण करीत होतो. बाकीचे लोक आमच्या आधी निघून गेले होते. आम्ही ५-६ जणच पाठीमागे होतो. हसी, मजाक मध्ये आम्ही डोंगरातून वाट काढीत चालत होतो. मध्येच भयाण जंगल तर मध्येच विरळ जंगल होते. निलेश सर, डॉ.राहुल सर, शाम मामा मला सारखे म्हणत होते, पाय जपून टाक. काठी हातात घट्ट धर. काठी वाजवत चाल. मी त्या पद्धतीने चालत होतो. मी मामाला विचारले, अजून किती लांब आहे. मामा म्हणाला, आता शेवटचा ७ डोंगर सुरू होईल. तो डोंगर पहिल्या डोंगरापेक्षाही चढाईचा आहे. त्यामुळे निट, व्यवस्थीत पाय टाकून चाल. मला सर्वांनी मध्ये घेतले होते. जेणेकरून मी कुठे चुकू नये. टप्प्यातील शेवटचा डोंगर सुरू झाला. मी बॅटरीच्या प्रकाशात अंदाज घेतला की किती उंच डोंगर आहे. परंतू त्या डोंगराचे टोक काही केल्या मला दिसले नाही. मनात ठरवले आता स्वामींनी एवढ्या लांब आणले आहे तर तेच येथून पुढे नेतील आणि डोंगर चढाईस सुरूवात केली. अत्यंत दगडधोंड्याचा रस्ता होता. प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत होते. उजव्या बाजूला खोल दरी होती. मी जपून पाऊल टाकत मार्गक्रमण करीत होतो. चालता चालता अचानक माझा पाय निसटला आणि मी खाली गुडघ्यावर बसलो. तेवढ्यात मामा म्हणाला, मुन्ना सावकाश.....मी म्हणालो, काही प्रॉब्लेम नाही...उठलो आणि आम्ही थोडी विश्रांती घ्यायचे ठरवले. आता ७ व्या डोंगरातील शेवटचा टप्पा राहिला होता. येथून पुढे पुन्हा सपाट प्रदेश सुरू होणार होता. आम्ही अंधार्‍या रात्रीत कसाबसा तो टप्पा पूर्ण केला आणि सपाट प्रदेश सुरू झाला. आजचा मुक्काम हा अक्क महादेवी च्या गुहेमध्ये होता. आता मनामध्ये उत्सुकता लागली होती की, कशी असेल ही गुहा. असा विचार करीतच आम्हा एका ठिकाणी थांबलो. मी विचारले काय झाले? तर मामा म्हणाला, हा स्वामींचा नाम आहे. मी म्हणालो, म्हणजे? डॉ.राहुल सर म्हणाले, स्वामींचा नाम ज्याप्रमाणे यु आकाराचा असतो ना तसा हा दगड आहे. याला स्वामींचा नाम म्हणतात. मी ते पाहिले आणि आश्‍चर्यचकितच झालो. कारण स्वामींच्या कपाळी जसा नाम आहे तसाच नाम या दगडावरती होता. मी स्वामींच्या लिला पाहून अचंबीत झालो आणि त्या नामावर डोके ठेवून नतमस्तक झालो. मामा म्हणाला, पुढे स्वामींचे पाऊलपण आहे. मला आता प्रचंड उत्सुकता लागली होती. स्वामींच्या चरण दर्शनाची ओढ लागली होती. अशा मनःस्थितीतच आम्ही स्वामींच्या चरणाकडे मार्गक्रमण करू लागलो.

आता रातकिड्यांची किरकिर सुरू होती. मध्येच दूर कुठून तरी एखाद्या जंगली श्‍वापदाचा आवाज येत होता. मनात एक प्रकारे भितीही होती. परंतू स्वामी दर्शनाच्या ओढीने ही भितीही मध्येच गायब होत होती. चालत चालत आम्ही स्वामींच्या चरणाजवळ आलो. येथे पोहोचलो आणि पाहतो तो काय स्वामींचे चरण. आज खरोखरच मी धन्य झालो. मी पटकन माझ्या पाठीवरील बॅग काढली, हातातील काठी ठेवली, बूट काढले आणि स्वामींच्या चरणावर डोके ठेवले. श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय म्हणत मी स्वामींच्या चरणावर नतमस्तक झालो. आज माझे जीवन सार्थक झाले. समुद्र गुरूजी म्हणाले, दिवसा आलो असतो तर मस्त चंदनाची पूजा केली असती परंतू रात्रीच्यावेळी कशी करणार पूजा? सर्वांनी स्वामींच्या चरणाचे दर्शन घेतले आणि अक्क महादेवी गुहेकडे मार्गस्थ झालो. चालत चालत आम्ही अक्क महादेवी गुहेजवळ पोहोचलो. सगळीकडे उजाड माळरानच होते. मी मामाला म्हणालो, इथे गुहा कोठे आहे? मामा म्हणाला, खाली बग. सुमारे ३०-४० पायर्‍या खाली उतरलो आणि समोर एकाच दगडाचे छत असलेली अक्क महादेवीची गुहा दिसली. सगळीकडे दाट अंधार होता. बॅटरीच्या प्रकाशात ती गुहा खूप भयानक वाटत होती. आमच्या आधी आलेले कधीच झोपी गेले होते. मी घड्याळात वेळ पाहिली तर रात्रीचे १२.३० वाजले होते. या गुहेत खूप माणसे झोपी गेली होती. आम्ही एका ठिकाणी जागा शोधली आणि आमच्या बॅग काढून ठेवल्या. चालून आल्यामुळे प्रचंड भूक लागली होती. येथे मस्त भात आणि सांबर बनविण्यात आले होते. आम्ही ताट घेतले आणि मस्त भात व सांबरवर ताव मारला. जेवण झाले. निलेश सर म्हणाले, सकाळी स्वामींच्या दर्शनाला प्रकट स्थानाकडे जायच आहे. मी म्हणालो, मग हे काय आहे? ते म्हणाले, ही अक्क महादेवीची गुहा आहे. येथे अक्क महादेवीं व अनेक साधू पुरूषांनी तपश्‍चर्या केली आहे. अक्क महादेवीची ही तपोभूमी आहे. मी मनोमन नमस्कार केला आणि झोपी गेलो..कारण उद्या स्वामींच्या दर्शनाला जायचे होते....

क्रमशः
--------------------------------

औदुंबर सूर्यकांत भिसे, वेळापूर
--------------------------------

Wednesday, 20 April 2016

श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान, कर्दळीवन प्रवासवर्णन


॥ श्री स्वामी समर्थ ॥
----------------------
श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान, कर्दळीवन प्रवासवर्णन
----------------------
दि.२२ जानेवारी २०१६
आज सोलापूरला जायचे होते. कारण होते दि.२३ रोजी श्री स्वामी समर्थांच्या प्रकट स्थानाकडे निघायचे होते. त्यामुळे माझी गडबड सुरू होती. सोलापूरवरून कॅलेंडर प्रिंटींग केलेले आणायचे होते. योगीचा फोनवर फोन येत होता. परंतू कॅलेंडर आणण्यासाठी पार्टीकडून पैशांची जुळवाजुळव सुरू असल्याने सायंकाळचे ४ वाजत आले तरीसुद्धा माझे सोलापूरला जाण्याची चिन्हे दिसत नव्हती. काय करावे काहीच कळेना. शेवटी स्वमींना हात जोडले आणि म्हणालो, बघा स्वामीराया, तुमच्या दर्शनासाठी येत होतो. पण पैशांची व्यवस्था होत नाही. काय करू. आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. त्यावर सायंकाळी ४.१५ वाजता मी पुन्हा बँकेत गेलो तर अकौंटला पैसे ट्रान्स्फर झाले होते. त्या आनंदातच मी ते पैसे काढले आणि पप्पांना फोन केला. पप्पा पण खुश झाले आणि मनोमन मी स्वामींचे आभार मानले. म्हणले चला आता स्वामींच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला. मी व पप्पा घरी आलो. बॅग भरली आणि आमच्या कारने सोलापूरकडे मार्गस्थ झालो. आमचे गाडीमध्ये बोलणे सुरू होते. पप्पा म्हणले, मी ६ वाजेपर्यंत वाट पाहणार होतो. जर कॅलेंडर आणण्यासाठी पैशांची व्यवस्था झाली नसती तरी मी तुला स्वामी दर्शनासाठी पाठविले असते. परंतू स्वामींनी सगळीच व्यवस्था केली. बोलत, गप्पा मारीत आम्ही सोलापूरला पोहोचला. तेथे योगीपण आला. कॅलेंडर गाडीमध्ये ठेवले आणि मला शाम मामाकडे सोडून पप्पा व योगी वेळापूरकडे मार्गस्थ झाले. रात्री मामी नी माझी बॅग व्यवस्थित भरली. कारण बॅग घेवूनच मला डोंगर चढायचा होता. त्यामुळे आवश्यक तेवढेच सामान बॅगमध्ये भरले आणि मी पहाट होण्याची वाट बघत राहिलो. मामा म्हणाला, ३ वाजता उठायचे आहे. बरोबर ५ वाजता निघायचे आहे. त्यामुळे मी म्हणले, आपल्याला उशीर नको म्हणून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण स्वामींच्या दर्शनाची एवढी आस लागून राहिली होती की, काही केल्या झोपच लागेना. डोंगर कसा चढायचा? तेथील वातावरण कसे असेल? एवढा लांबचा पल्ला आपण पूर्ण करू का? या व अशा अनेक शंका मनात ठेवूनच कधी झोप लागली कळलेच नाही.

क्रमशः
कर्दळीवनाकडे जाताना
--------------------------------

औदुंबर सूर्यकांत भिसे, वेळापूर
--------------------------------